Thursday, May 22, 2025

देवं चैवात्र पंचमम्



"अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् । विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥"

कुठल्याही कार्याच्या यशस्वी होण्यासाठी पाच गोष्टी आवश्यक असतात: एक म्हणजे अधिष्ठान (स्थान किंवा शरीर), दुसरा कर्ता (कर्म करणारी व्यक्ती), तिसरा करण (साधने, साधने किंवा उपकरणे), चौथा विविध प्रकारचे प्रयत्न किंवा क्रिया, आणि पाचवा व अंतिम म्हणजे दैव (दैवी इच्छा किंवा प्रारब्ध). भगवद्गीतेच्या या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की कोणतेही काम केवळ माणसाच्या प्रयत्नांवर अवलंबून नसते, तर त्यामध्ये इतरही अनेक घटक कार्यरत असतात. या सर्वांत शेवटचा घटक म्हणजे दैव, ज्यावर मानवाची सत्ता नसते. म्हणूनच आपण आपल्या कृतीचे परिणाम पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही; त्यात काहीतरी अदृश्य शक्ती (दैव) कार्यरत असते. हा श्लोक आपल्याला विनम्रतेचा, संयमाचा आणि कर्तृत्वाच्या मर्यादांचा विचार करण्यास प्रवृत्त करतो.

🙏🙏

Sunday, May 18, 2025

जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.

जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.
जीभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे
माणूस हवा तेवढा वृध्द होवो, देहावर कितीही सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही.तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच टिकून राहतो ! 

जीभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रीयावर विजय मिळवणं कठीणातलं कठीण काम आहे

 मुख-म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत. पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते,

कुणाला ती घायाळ करते,
तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते.
तिच्यातून अमृत झरते,
तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.
जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात तसेच काटेही उगवतात.

अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर उत्तम ताबा मिळवू शकतात तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात.

🤫 कटु, पण त्रिकाल सत्य...