Monday, August 8, 2022

दहाव्याचे लाडू

 


दहाव्याचे_लाडू 


पाटलाची म्हातारी मेली. म्हातारी मेल्याचं दुःख पाटलाला. त्याचं गावाला काय? गाव खुशीत होतं कारण दहाव्याचे लाडू खायला भेटणार! म्हातारी शनिवारची मेली. पुढच्या शनिवारी आठ दिवस होतील. मग सोमवारी दहावा. गावकरी दिवस मोजू लागले. 


शनिवारीच मयत झाली. रविवारी सावडलं. पाटलाच्या वाड्याला सुतक असलं तरी सोमवारी गावातले इतर व्यवहार नेहमीसारखे सुरू झाले. मराठी शाळा भरली. प्रार्थनेच्या वेळी मुख्याध्यापक बोलू लागले. 


'मुलांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपल्या गावच्या पाटलांच्या आईचं निधन झालं आहे. पुढच्या सोमवारी दशक्रिया विधी आहे. पाटलांनी गावकऱ्यांबरोबर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही दहाव्याच्या जेवणासाठी बोलावलं आहे...' 


पुढे मुख्याध्यापकांनी श्रध्दांजलीसाठी विद्यार्थ्यांना दोन मिनिटं स्तब्ध उभं राहायला सांगितलं. शरीराने स्थिर उभ्या मुलांच्या मनात खळबळ माजली होती. दहाव्याचं जेवण? डाळीचे लाडू खायला मिळणार? लाडू! 


श्यामूने लाडू नावाचा गोड पदार्थ एकदाच खाल्ला होता! त्यानंतर तो लाडू कितीतरी वेळा त्याच्या स्वप्नात आला होता. 


लाडवांसारख्या मिठाईचं एवढं अप्रूप? हो, होतंच. ते पन्नासचं दशक होतं. स्वातंत्र्य मिळून पाच वर्षही झाली नव्हती. सगळीकडे गरिबी आणि उपासमारी. लोकांचे खायचे हाल. मिठाई कुठून मिळणार? खेड्यातली परिस्थितीत तर अजूनही वाईट. 


गुळवणीबरोबर तेलच्या खायला मिळतात म्हणून सणासुदीची वाट पाहणारे गरीब. त्यांना लाडू, जिलेबी, गुलाबजाम, पेढ्यांसारखी मिठाई कोण देणार? एखाद्या देशमुखाच्या, पाटलाच्या, सावकाराच्या लग्नकार्यात अशी मिठाई खायला मिळायची. पंगतीत आपण मागू तेवढं वाढणारा वाढपी, अन्नदानात काही कमी पडू न देणारा दानशूर यजमान असेल तर खाणारेही पोट फुटेपर्यंत खात. न जानो तसं पक्वान्न परत मिळेल न मिळेल. 


मारतीचं घर अगदीच जुनं होतं. मागच्या दोन पिढ्यांत त्याची डागडुजी झाली नव्हती. त्या घराकडे बघूनच त्यात राहणारांची कीव यावी. दारापुढे ना गोठा, ना कुठलं जनावर. मारती मोलमजुरी करायचा. त्याच्या अंगणात एक बाभळ होती. त्या बाभळीमुळे मारतीचं दैन्य अधिक उघडं पडे. 


'पुढच्या सोमवारी आम्ही लाडू खायला जाणार!' उड्या मारतच घरात शिरलेला श्यामू म्हणाला. 


'मी तुला दहाव्याला नेणार नाही,' मारती सावध झाला. दहाव्याच्या लाडूंसाठी पोरगा आपल्या मागे लागतोय की काय? दहाव्याला गावातला प्रत्येक माणूस जाणार पण बायका, लहान मुलं तिथं कशी जातील? लग्नकार्य थोडंच आहे? 


मग श्यामूने शाळेतील मुलांना जेवणाचं आमंत्रण असल्याचं सांगून बापाच्या छातीवरचं ओझं कमी केलं. तरीही मारतीच्या चेहऱ्यावरची चिंता कमी झाली नाही. मला, पोराला लाडू खायला मिळतील. पण हिचं आणि सुभीचं काय? 


'श्याम्या, मी पण तुझ्याबरोबर लाडू खायला येणार!' छोटी सुभी म्हणाली. 


'चल हाट्ट! तिथं फक्त शाळेतल्या पोरांना बोलावलंय,' एरवी बहिणीशी मायेने बोलणाऱ्या श्यामूला 'आज आपण काहीतरी विशेष असल्याचं' वाटत होतं. 


'नको नेऊ! मी दादाबरोबर जाईन,' सुभीने बापाकडे मोर्चा वळवला. 


पण मारती पोरीला घेऊन दहाव्याला कसा जाणार? लोक काय म्हणतील? पोरीच्या तोंडांकडे बघून तो खिन्न झाला. 


मागच्याच महिन्यात सुभी पाच वर्षांची झाली होती. ती श्यामूपेक्षा दोन वर्षांनी लहान. सुभीला शाळेत टाकली असती तर आज तिनेसुध्दा लाडू खाल्ले असते. तसं पाहता शाळेला फी नव्हती पण त्यावेळी मारतीकडे पोरीला पाटी-पुस्तक, कपडे घेण्यासाठीही पैसे नव्हते. आणि म्हणूनच या वर्षी सुभीची शाळा राहिली. 


पोरगी 'मला लाडू खायला न्या' म्हणाल्यावर

मारतीला ना पोरीकडे बघता आलं, ना तिला उत्तर देता आलं. 


'दादा, मला लाडू खायला नेशील ना?' बाप काही बोलेना म्हणून न राहवून सुभीने विचारलं. 


'नाय गं तायडे... पोरासोरांना मयतीला, दहाव्याला नेता येत नाय,' बापाने पोरीला समजावण्याचा प्रयत्न केला 'पण मी तुझ्यासाठी लाडू घेऊन येईन. मग तर झालं?' 


सुभीला काय? लाडू खाण्याशी मतलब! ती बापाला बिलगली. 'मला दोन लाडू आणा!' दोन्ही हातांच्या ओंजळी पुढे करत ती म्हणाली. 


'दोन काय, चार आणतो,' बापाने पोरीला शब्द दिला. 


जेवताना एखादा पदार्थ आवडला की पत्रावळीतून उचलून तो खिशात टाकायचा आणि 'संपला' म्हणून वाढप्याकडे परत मागायचा. असा प्रकार सर्रास चाले. त्यात कुणाला कमीपणा वाटत नसे. बायका पदरात, पुरुष कोपरीच्या खिशात, पोरं शर्टाच्या आत खाद्यपदार्थ लपवत. एखाद्याने प्रमाणापेक्षा जास्त पदार्थ खिशात घातले तर मात्र वाढपी चिडत. 


लोकांच्या अशा वागण्याने पंगतीत अन्न पुरणार नाही म्हणून कधी कधी स्वतः यजमान पंगतीवर लक्ष ठेवत. 


पूर्वी अशा जेवणांत गव्हाची लापशी असायची. ती सुद्धा लोक भुताळ्यासारखी खात. नंतर डाळीचे लाडू आले आणि लाडूवाला वाढायला येताच 'मला! मला!' ओरडणं, लाडू खिशात घालणं, पोट टम्म फुगून अन्न घशात येईपर्यंत खात राहणं असे प्रकार होऊ लागले. अशाने ज्याच्या घरी जेवण असे तो यजमानही वैतागे. लाडू शेवटच्या पंगतीपर्यंत पुरत नसत. 


चोरून खिशात घातलेल्या लाडवांनी आणि तेलच्यांनी लोकांचे कपडे तेलकट, घाणेरडे होत. पण पोटापुढे कपड्यांची कदर कुणाला? 


अलीकडच्या काळात मोठी माणसं पंगतीत बसून लाडू चोरायला लाजत असली तरी ती लहान मुलांना तसं करायला प्रवृत्त करत. लहान मुलांना काय कळतंय? एखादा वाढपी त्यांच्यावर खेकसला, मुलांचा अपमान करून त्यांच्या खिशातले लाडू काढून घेतले तरी काय फरक पडतो? 


'दहाव्याच्या दिवशी जेवताना तू दोन-चार लाडू तुझ्या शर्टात टाक,' मारतीने श्यामूला सांगितलं. 


'चालन, पण घरी आल्यावर त्यातला एक मी घेईन!' श्यामूने लगेच अट टाकली. ती अट मान्यही झाली. 


गावात मिठाईचं दुकान नव्हतं. नाहीतर लोकांनी खिशाला चिमटा घेऊन दोन पैसे वाचवले असते आणि लाडू खाल्ले असते. पण आता लाडू फक्त अशा जेवनावळीतच मिळत. शेवटचे लाडू कधी खाल्ले हे गावाला चांगलं आठवत होतं. दोनच वर्षांपूर्वी पाटलाच्या पोरीचं लग्न झालं होतं, त्यावेळी. 


त्या लाडवांची चव अजूनही श्यामूच्या व सुभीच्या जिभेवर तरळत होती. मऊसुद बुंदी गोड-गोड पाकात भिजवून नंतर बांधलेले ते लाडू इतके चवदार झालेले की तोंडात टाकताच विरघळले होते. अहाहा! आजही त्या लाडूंची नुसती आठवण झाली तरी तोंडात लाळ जमा होते. 


दहाव्याचा दिवस जवळ येऊ लागला आणि शाळेतलं वातावरणही मिठासदार होऊ लागलं. 


'यावेळी मी सहा लाडू खाऊन दाखवतो!' चौथीतला पोरगा म्हणाला. 


'मी सुरूवातीला नुसतं लाडूच खाणार! लाडूंनी पोट भरल्यावर मंग तेलच्या, शाकभाजीला हात लावणार,' दुसरा म्हणाला. 


दहाव्याचं जेवण, लाडू, तेलच्या, शाकभाजी, आमटी-भात याशिवाय शाळेत दुसरा विषय नव्हता. 


'शाम्या, तुझ्या पुस्तकातलं लाडूचं चित्र दाखव की!' श्यामू शाळेतून घरी आला की सुभी बालभारतीचं पुस्तक घेऊन त्यातलं लाडूचं चित्र बघत चित्रावरून बोटं फिरवायची. कधी कधी ती चित्रातले लाडू चाटायचीदेखील. 


आता दहाव्याला तीनच दिवस राहिले. पण ते तीन दिवस तीन वर्षांसारखे वाटले. अखेर दहाव्याचा दिवस उजाडला. सकाळी घरातून बाहेर पडताना काहीतरी खाऊन जाणाऱ्या मारतीने आज उपाशीच घर सोडलं. 


गावच्या स्मशानभूमीत दहाव्याचे विधी पार पडले आणि लोक पाटलाच्या वाड्याकडे निघाले. शाळेतल्या पोरांना स्मशानभूमीवर न नेता परस्पर वाड्यावरच नेलं. 


डझनभर खोल्या असलेला मोठा वाडा. वाड्याच्या मागच्या बाजूला गाई गुरांचा गोठा. एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली चार सुडौल बैल बांधलेले. ट्रॅक्टर, जीपसारख्या वाहनांनादेखील सावली केली होती. शेतातल्या विहिरीचं पाणी पाट घालून मोटेनेे वाड्यापर्यंत आणलेलं. वाड्याचा परीसर आंबा, जांभूळ, पेरू, चिंच, सिताफळ अशा फळझाडांनी बहरला होता. 


आजच्या जेवणाची व्यवस्था वाड्यापुढच्या मोकळ्या जागेत केलेली. 


पहिल्यांदा पोरांना ओळीत जेवायला बसवलं. मांडी घालून बसलेली पोरं लाडूंची वाट बघत गुडघ्यांची ढोलकी वाजवू लागली. मग पत्रावळ्या आल्या. पत्रावळीत मीठ पडल्यावर भाताची वाढी येईपर्यंत पोरांनी दोन्ही हातांनी पत्रावळ्या जमीनीवर दाबून धरल्या. वाढप्यांनी शिस्तीत वाढायला सुरुवात केली. 


'पोरांना बघून वाढा...' म्हातारा पाटील वाढप्यांना सूचना देऊ लागला. 


'मला दोन लाडू द्या,' श्यामू वाढप्याला म्हणाला. श्यामूकडे रागाने बघत वाढप्याने दोन लाडू पत्रावळीत टाकले. त्यातला एक उचलून श्यामू शर्टात टाकणार तोच आवाज आला. 


'पोरांनो, खायचं तेवढं खा. पण घरी काय न्यायचं नाही.' पंगतीच्या कोपऱ्यावर उभा म्हातारा पाटील म्हणाला. चपापलेल्या श्यामूने लाडू पुन्हा पत्रावळीत ठेवला. 


'अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र

तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र...' 


खेडेगावांनी पंगतीतल्या जेवणापूर्वी म्हणला जाणारा श्लोक झाला आणि लोकांनी घाई घेतली. काहींनी आख्खे लाडू तोंडात कोंबले तर काहींनी ते दोन घासांत संपवले. पंगतीत जेवताना आवडता पदार्थ पटकन खाल्ला की पुन्हा मागता येतो. 


ताटात विविध चवींचे पदार्थ असताना नुसतं गोड खाण्यात कसली गंमत? शिवाय एखादा पदार्थ कितीही अलाभ्य असला तरी ताटात पडल्यावर त्याचं तितकं अप्रूप वाटत नाही. हळूहळू पोरं तेलच्या, शाकभाजी, आमटी-भातही खाऊ लागले. एवढं असलं तरीही लाडू वाढणारा वाढपी पंगतीत आला की पोरं लाडू घेतल्याशिवाय राहत नव्हती. 


सुभीसाठी लाडू कसे न्यायचे? खाता खाता श्यामू विचार करत होता. शर्टच्या वरच्या खिशात लाडू दिसले असते. बसल्यामुळे चड्डीच्या खिशात लाडू घालता येत नव्हते. शेवटी लोकांच्या नजरा चुकवत एक-एक करत श्यामूने इन केलेल्या शर्टच्या आत चार लाडू टाकले. 


'ए पोरा, तू इकडं ये,' जेवण झाल्यावर पंगतीतून उठून बाहेर पडणाऱ्या श्यामूला पाटलाच्या गड्याने बोलावलं. इन केलेल्या शर्टात पेरू, कैऱ्या ठेवाव्यात तसे ठेवलेले ते लाडू लपून राहत नव्हते. श्यामूची मान खाली गेली. जेवणाची वाट बघत दूर उभ्या मारतीचं लक्ष पोराकडे होतंच. 


श्यामूला पाटलाच्या गड्याने आवाज दिलेला बघताच मारतीने चोरासारखी मान दुसरीकडे वळवली. इथे पोराची चोरी पकडली गेल्यावर मारतीच्या चेहऱ्यावर दुःखाऐवजी लाचारीची भावना दिसली. 


'काढ ते लाडू!' गडी गरजला, 'दादांनी सांगितलंय ना खिशात काय न्यायचं नाय?' 


'अहो, असू द्या की...' बारीक तोंड करून श्यामू म्हणाला. 'माझ्या बारक्या बहिणीला लाडू खायच्यात.' 


'तू ते लाडू मुकाट्या काढून देतो का मी काढून घेऊ?' गड्याचा आवाज वाढला. श्यामूने एक बटन खोलून शर्टात हात घातला आणि तीन लाडू काढून दिले. 


'एवढा एक ठेवतो...' शर्टात राहिलेल्या एकमेव लाडूवर हात ठेवत श्यामू म्हणाला. 


'तू तसा ऐकणार नाय!' गड्याने श्यामूचा दंड पकडला आणि त्याच्या शर्टात हात घालून चौथा लाडू काढून घेतला. 


'चल निघ... भिकारडा कुठला!' पाटलाच्या घरी सालगडी म्हणून राबणारा एक गरीब माणूस दुसऱ्या गरिबाला भिकारडा म्हणत होता. मोठ्यांच्या शेजारी उभं राहिल्यावर माणसाला आपणही मोठं असल्याचा भास होतो. त्या गड्याचंही तसंच झालं होतं. 


तसं पाहता लाडू चोरल्याची श्यामूला लाज वाटली नव्हती. त्यात काय? पोरं दुसऱ्यांच्या बागांतून आंबे, चिंचा, पेरू, जांभळं चोरतातच की? श्यामूला वाईट वाटलं पाटलाच्या गड्याने त्याच्याकडचे लाडू हिसकावून घेतल्याचं. 


श्यामूने आजूबाजूला नजर फिरवली. त्याच्यासारखीच लाडू चोरताना पकडली गेलेली पोरं निर्लज्जपणे हसत होती. त्यांना बघून श्यामूची अपराधीपणाची भावना कमी झाली. 


आपल्या मुलांची चाललेली असली उलटतपासणी पाहून मोठी माणसं एकमेकांची नजर चुकवत होती. 


सगळ्या मुलांचं उरकल्यावर शिक्षकांनी त्यांना रांगेत उभं केलं आणि गावात आणलं. 


'सुभेऽ श्यामू लाडू घेऊन घरीच येणारेहे! तो काय कुठं पळून जायचाय?' आई हसली. सुभी सकाळपासून श्यामूची वाट पाहत दारात उभी होती. नाही म्हणलं तरी आईलाही लाडू खावू वाटत होते. 


'आला बघ भाऊ!' एरवी मोठ्या भावाला 'श्याम्या' हाक मारणारी सुभी आता त्याला 'भाऊ' म्हणत होती. तो जसा जवळ येऊ लागला तशी ती आनंदाने टाळ्या पिटू लागली. शेवटी तिला राहावलं नाही आणि ती श्यामूकडे धावत सुटली. 


जवळ जाऊन पाहिलं तर श्यामूचा चेहरा पडलेला दिसला. त्याचे खिसे रिकामे होते. 


'माझं लाडू लपून ठेवलं काय?' सुभीला संशय आला. श्यामूच्या हाताला धरून ती त्याच्याभोवती गोल फिरली. त्याच्याकडे लाडू नव्हते. 


'माझ्या वाट्याचं लाडू तूच खाल्लं ना?' सुभी रागाने लालबुंद झाली. मोठ्या भावाला खाऊ का गिळू असं तिला झालं. श्यामू काही बोलला नाही. 


'तू एवढा हावरा आसन असं वाटलं नव्हतं!' सुभीने श्यामूवर एक तिरस्कारयुक्त नजर टाकली. 


'मी तुझ्यासाठी लाडू घेतले होते. पण पाटलाच्या गड्याने ते हिसकावून परत घेतले.' श्यामूने बहिणीला सांगितलं पण तिचा विश्वास बसला नाही. श्यामूला लाडू किती आवडतात ते तिला माहीत होतं. त्याने येताना स्वतःच लाडू खाल्ले असणार! 


'मर जाऽ मसणात!' दोन लाडूंसाठी सुभीने भावाला शाप दिला. 


पण असं बोलून काही वेळाने सुभीलाच रडू फुटलं. बहिणीला रडताना बघून श्यामूही रडायला लागला. आईला कळेना की दोघांपैकी कुणाची बाजू घ्यावी, कुणाला समजून सांगावं, खरंखोटं कसं करावं. 


त्यानंतर तासाभरात मारती घरी आला. बापाला येताना बघताच सुभी अंगणात धावली. पण बापाचं पडलेलं तोंड बघून ती काय समजायचं ते समजली. मारती पोरीजवळ आला. सुभीच्या डोक्यावरून हात फिरवून त्याने तिला जवळ घेतली. 


'रडू नको पोरी... उद्या येरवड्यात जाऊन तुझ्यासाठी लाडू आणतो,' असं म्हणायचीही मारतीच्या खिशाची ऐपत नव्हती. त्याचे डोळे अश्रूंनी तरारून आले. 


दहाव्याच्या जेवणात पोटभर लाडू खाऊन आलेले बापलेक घरी लाडवांची वाट पाहणाऱ्या सुभी व तिच्या आईच्या नजरेत बघू शकत नव्हते. 


आपण 'समानता, समानता' ओरडतो. पण समानता कशी येणार? मारुती विचार करत होता. पैशावाले चांदीच्या ताटात जेवतात आणि गरीब पत्रावळीवर. तो फरक राहणारच. पण एखाद्या गरीब कुटुंबांतील काहींना पोटभर लाडू खायला मिळतात आणि काहींना पाहायलाही मिळत नाहीत. ते कसं? 


'दादा, पुढच्या वर्षी माझं नाव शाळेत घालायचं! मंग गावात कोण मेलं की मलापण लाडू खायला मिळत्यान. घालशीन ना मला शाळेत? तुला माझी शप्पथहे.' सुभी बापाला लाडीगोडी लावत होती. 


अश्रूंनी डबडबलेले डोळे लपवण्यासाठी बापाने पोरीला उचलून कडेवर घेतली आणि तो घरात गेला. 


दहा दिवसांपूर्वी पाटलाची म्हातारी वारली आणि मारतीच्या घरात आज सुतक पडलं.